Saturday, September 15, 2012

होमिओपथी - एक सहजसुंदर उपचार पद्धती

खूपशा लोकांना होमिओपाथी बद्दल नीटशी माहिती नसते. त्यामुळे बरेच लोक ह्या उपचार पद्धती बाबत खूपसे साशंक असतात. फक्त त्यात औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत एवढी जुजबी माहिती त्यांना असते. परंतु हे माहित नसते कि अत्यंत जुन्या आणि किचकट आजारातही होमिओपाथी च्या मदतीने ते रोगमुक्त होऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या उपचार पद्धतीमुळे आपली रोगप्रतिकारक-शक्ती वाढण्यास मोलाची मदत होते.


रोग कशामुळे होतात ह्याचे उत्तर बरेच लोक काही जंतू कृमी अथवा आहारातल्या कमतरता असे देतील. परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की हे जंतू आपल्या शरीरावर हल्ला करू शकतात कारण आपण आतून मजबूत नाही. किंबहुना आपण असे काही अंगभूत कमतरता घेऊन फिरत असण्याची शक्यता आहे ज्या मुळे आपल्याला कुठलेही आजार चटकन होतात. नक्कीच आजच्या युगातला चुकीचा आहार आपल्या शरीराला अजून चुकीच्या मार्गावर नेतो. ह्या सर्व घोटाळ्यामुळे आपण अशा काही आजारांच्या विळख्यात सापडतो.

होमिओपथी मुळे आपण ह्या दुर्धर आजारांपासून पूर्ण सुटका मिळवू शकतो. आपल्याला वाटतं की हे होमिओपथिक डॉक्टर आपल्याला एवढे प्रश्न का बरे विचारत आहेत? पण ह्या प्रश्नातूनच ते आपले खरेखुरे व्यक्तिमत्त्व जाणून घेऊ शकतात. आणि होमिओपथी हे एक व्यक्तिमत्त्व जाणून उपचार देण्याचे शास्त्र आहे. त्यात आपण कधीच आजारासाठी औषध देत नाही. याचा अर्थ असा नाही की आपल्याला होमिओपथी चे औषध सुरु केल्यावर असलेली रोगलक्षणे नाहीशी होणार नाहीत. ती नक्कीच नाहीशी होतील परंतु जर रोग जुनाट असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तो रोग पुन्हा आपल्या वाटेला जाणार नाही याची तरतूद ह्या औषधांमुळे होऊ शकेल. हीच तर होमिओपथी ची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणता येईल.

परंतु केवळ दुर्धर आजारामध्येच होमिओपथी चा उपयोग होतो असे मात्र नाही. कित्येक प्रासंगिक आजारामध्ये, ताप सर्दी खोकला हगवण एलर्जी पाय किंवा हात मुरगळणे यांसारख्या Acute आजारांमध्ये देखील होमिओपथी चा अतिशय फायदा होतो. आपण नुसते त्या आजारापासून मुक्त होत नाही तर ते आजार वरचेवर आपल्याला त्रास देऊ नयेत यासाठीची तरतूदही या औषधांमुळे होते.

या पेक्षा दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही वयोगटासाठी होमिओपथी ची औषधे वरदान ठरतात. वार्धक्यात जेव्हा काही औषधे दिल्यामुळे दुष्परिणामांचा धोका जास्त असतो त्या वयोगटात देखील होमिओपथी अतिशय उपयोगी पडते. अर्भकावस्थेतही आपण याचा सयुक्तिक वापर करू शकतो, ज्या योगे बाळाला पुढील आयुष्यात आरोग्याची खूप मोठी आणि उपयुक्त अशी शिदोरी आपण देऊ शकतो.

परंतु कुठलाही गैरसमज होमिओपथी बद्दल पसरवू नये. आपणास कोणी काहीही माहिती होमिओपथी बद्दल दिली तरी ती योग्य आहे अथवा नाही याची चौकशी होमिओपथी च्या डॉक्टरांकडे करावी म्हणजे आपण आणि आपले कुटुंबीय होमिओपथी च्या अप्रतिम अशा उपयोगापासून अकारण वंचित राहणार नाही!No comments:

Post a Comment